छत्रपती शिवाजी महाराजांनंतर रयतेच्या सुखाचा आणि हिताचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी आयुष्यभर कार्यरत अशी राजर्षी शाहू महाराजांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना रयतेचे मोठे प्रेम मिळाले. प्रजा शिकली तरच ती शहाणी होईल आणि संस्थानची प्रगती होईल, हे ओळखून त्यांनी मोठ्या प्रमाणावर शाळा आणि वसतिगृहे सुरू केली. धरणे बांधली, विहिरी खोदल्या. उद्योगव्यवसाय सुरू होण्यासाठी मदत केली. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी झाला. कागलचे जहागीरदार श्री. जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच राजर्षींचा स्वभाव दिलदार, पण काहीसा अबोल असा होता. त्यांचे भेदक डोळे, श्यामल वर्ण आणि धिप्पाड शरीरयष्टी पाहून कुणीही त्यांच्या जवळ येण्यास कचरत असे. वयाच्या दहाव्या वर्षी, १७ मार्च १८८४ रोजी त्यांचे दत्तकविधान झाले आणि कोल्हापुरात राज्यारोहणसमारंभ झाला. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. धारवाडमध्ये असताना त्यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उठणे, नंतर घोड्यावरून रपेट मारणे, नेमबाजी करणे किंवा दूरपर्यंत फेरफटका मारणे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी शाळेची वेळ होती...