राजर्षी शाहू महाराज




छत्रपती शिवाजी महाराजांनंतर रयतेच्या सुखाचा आणि हिताचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी आयुष्यभर कार्यरत अशी राजर्षी शाहू महाराजांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना रयतेचे मोठे प्रेम मिळाले. प्रजा शिकली तरच ती शहाणी होईल आणि संस्थानची प्रगती होईल, हे ओळखून त्यांनी मोठ्या प्रमाणावर शाळा आणि वसतिगृहे सुरू केली. धरणे बांधली, विहिरी खोदल्या. उद्योगव्यवसाय सुरू होण्यासाठी मदत केली.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी झाला. कागलचे जहागीरदार श्री. जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच राजर्षींचा स्वभाव दिलदार, पण काहीसा अबोल असा होता. त्यांचे भेदक डोळे, श्‍यामल वर्ण आणि धिप्पाड शरीरयष्टी पाहून कुणीही त्यांच्या जवळ येण्यास कचरत असे. वयाच्या दहाव्या वर्षी, १७ मार्च १८८४ रोजी त्यांचे दत्तकविधान झाले आणि कोल्हापुरात राज्यारोहणसमारंभ झाला. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.
धारवाडमध्ये असताना त्यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उठणे, नंतर घोड्यावरून रपेट मारणे, नेमबाजी करणे किंवा दूरपर्यंत फेरफटका मारणे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी शाळेची वेळ होती. नंतर तालीम, शिकार, दांडपट्ट्याचा सराव यात वेळ जाई. जेवणानंतर पुन्हा काही वेळ अभ्यास चालत असे. महाराजांच्या प्रगतीविषयी त्यांचे शिक्षक फ्रेजर म्हणत, ""महाराजांची प्रगती समाधानकारक आहे. त्यांना व्यवहारज्ञान चांगले अवगत आहे. त्यांची स्मरणशक्ती तीव्र आहे. स्वभावाच्या बाबतीत म्हणायचे तर ते निरोगी मनाचे आणि दिलदार स्वभावाचे आहेत. उदार आहेत. त्यांना अहंपणाचा वारादेखील नाही. महाराज चांगलेच धिप्पाड आहेत.
त्यांची उंची पाच फूट नऊ इंच (वयाच्या सोळाव्या वर्षी) आहे. त्यांची आकृती भव्य असून, शरीराची ठेवण चांगली आहे.'' येथील शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडला जावे, असे सुचवण्यात आले होते; परंतु इंग्रजांची या देशावर चालणारी सत्ता आणि त्या सत्तेच्या गुर्मीतून अरेरावीपणे वागणारी नोकरशाही आणि स्वार्थी स्वकीयांची लाचारी या गोष्टींचा महाराजांना मनापासून तिटकारा होता. त्यामुळे त्यांनी इंग्लंडला जाण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांनी आपला देश फिरून पाहण्याचे ठरवले. उत्तर भारतातील अनेक ठिकाणांना त्यांनी पूर्वीच भेट दिली होती. त्यामुळे १८९१ मध्ये कोल्हापुरातून निघून त्यांनी विजापूर, हैदराबाद, मद्रास, पॉंडिचेरी, तंजावर, बंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणांना भेट दिली.
तेथून ते श्रीलंकेतही जाऊन आले. परत आल्यावर त्यांनी संस्थानचा दौरा केला. हातकणंगले, शिरोळ, निपाणी, आंबोली, पन्हाळा असा सर्व भाग फिरून पाहिला. कधी वाहनात तर कधी चालत जाऊन त्यांनी रयतेची विचारपूस केली. आपला राजा आला म्हणून लोकांनी सर्वत्र त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दोन एप्रिल १८९४ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्वीकारली. त्या वेळी कोल्हापुरात मोठा समारंभ झाला. आता खरी आव्हाने होती. संस्थानात सगळ्या मोक्‍याच्या जागी युरोपियन अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली पुढे पुढे करणारे आपले स्वकीय होते. प्रजेच्या हितापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याकडेच यांचे लक्ष होते. आपल्या बहुतेक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राजापेक्षा गोरा अधिकारी जवळचा वाटे. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधाला तोंड देत महाराजांना कारभार करावा लागत होता.
पण महाराज अतिशय मुत्सद्दी आणि व्यवहारकुशल होते. त्यामुळे अनेकदा महाराजांनी या अधिकाऱ्यांना खुबीने अडचणीत आणले. त्यामुळे अनेक जण नोकरी सोडून निघून गेले. मग महाराजांनी हळूहळू सगळा कारभार स्वतःच्या नियंत्रणात आणला. कोर्ट-कचेऱ्यांची कामे तुंबून राहिली होती. महाराजांनी त्यात जातीने लक्ष घालून राज्यभर दौरा काढला. सहाशेवर अपिलांचा निकाल लावला. शेतकरी-कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. त्यांचे निराकारण केले. गारगोटीत मुलींसाठी शाळा सुरू केली (१८९४). खालच्या जातीतील लोकांना राबवून घेणारी वेठबिगारीची पद्धत त्यांनी कायद्याने बंद केली. १८९४ मध्ये त्यांनी पुण्याला भेट दिली, त्या वेळी सार्वजनिक सभेमार्फत हिराबागेत थाटात मेजवानी देण्यात आली.
महाराजांचा सत्कार करून त्यांना मानपत्र देण्यात आले. ते प्रा. गोपाळकृष्ण गोखले यांनी वाचून दाखवले. या सगळ्या अनुभवातून त्यांच्या लक्षात आले, की आपल्या प्रजेला शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे त्यांच्या कष्टांचे चीज होत नाही. त्या काळी जातिव्यवस्था घट्ट होती. त्यामुळे इच्छा नसताना त्यांना विविध जातींच्या मुलांसाठी वेगवेगळी वसतिगृहे सुरू करावी लागली. अर्थात सर्व जातींच्या मुलांनी एकत्र वसतिगृहात राहावे आणि शिक्षण घ्यावे, हे त्यांचे स्वप्न पुढे त्यांचेच शिष्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पूर्ण केले. संस्थानची आर्थिक-औद्योगिक प्रगती व्हायची असेल, भरभराट व्हायची असेल तर इथेच कुशल आणि शिक्षित मनुष्यबळ तयार व्हायला पाहिजे, हे ओळखून त्यांनी शिक्षणप्रसारावर भर दिला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुण्यात सुरू केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयासाठी त्यांनी मोठी मदत केली. संस्थेचे ते पदसिद्ध अध्यक्ष होते.
शेती पिकली, शेतकरी जगला तरच संस्थान टिकणार, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याला त्यांनी प्राधान्य दिले. एकदा ते दाजीपूर परिसरात गेले असताना भोगावती नदीकाठी उभे होते. नदी दुथडी भरून वाहत होती. त्यांच्या मनात आले, इथे धरण बांधायचे. पण त्यासाठीचा खर्च पाहून संस्थानचे अधिकारी धरण बांधण्यास राजी नव्हते. त्यांचे म्हणणे, या कामात राज्याची तिजोरी रिकामी होईल. त्यावर महाराजांचे म्हणणे होते, धरण झाले तर शेतीला पाणी मिळेल, उत्पादन वाढेल, वीजनिर्मिती होईल, कारखान्यांना वीज मिळेल.
रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे माझी प्रजा सुखी होईल. दरबारी लोकांना हे पटत नव्हते. महाराजांचा स्वतःच्या कार्यावर विश्‍वास होता. अखेरीस राधानगरी धरण उभे राहिले. पुढे महाराजांनी ठरवले तसेच झाले. शेतीला पाणी मिळू लागले. उसाची शेती डुलू लागली. गुऱ्हाळे लागू लागली. पिवळाधमक गूळ तयार होऊ लागला. कोल्हापूरचा गूळ देशभर नावाजला गेला. गुळाच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ वसली. शाहू मिलच्या उभारणीसाठी त्यांनी जागा आणि भांडवल दिले. त्याचबरोबर इचलकरंजीतील जिनिंग फॅक्‍टरी, रायबागचा रंगकाम कारखाना, शेंगदाण्याच्या गिरण्या, लाकूड शुद्धीकरण प्रकल्प (सत्त्व व अर्क काढणे) असे अनेक उद्योग उभे राहण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली.
अर्थात शाळा, वसतिगृहे, उद्योग, व्यापार, शेती, पाटबंधारे, खेळ, तालीम अशा सर्वच क्षेत्रांत मोठे काम उभे करणाऱ्या राजर्षी शाहूंना संस्थानातीलच अनेकांचा विरोध झाला. यातील बहुतेकांना आपले चालू असलेले उत्पन्न, आरामदायी काम, अधिकार सोडायचे नव्हते. अशा परंपरावाद्यांनी संस्थानातील बदलांना विरोध केला; पण राजर्षींनी त्या सगळ्यांचा विरोध मोडीत काढत प्रजेचे सुख, एवढाच विचार मनात ठेवून त्यासाठी अखेरपर्यंत कार्य केले. ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

Comments

Popular posts from this blog

10 Essential Tools for building ASP.NET Websites

Plot purchase